Friday 2 November 2012

हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांसाठी पुष्पौषधी

                                   हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांसाठी पुष्पौषधी
 
                      माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाने हॉस्टेल सुरु केले. वास्तुशांतीला बोलावल तेंव्हा मला तनयची आठवण झाली. तनयला हव्या त्या अभ्यासक्रमास आणि चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळाला म्हणुन निशा खुशीत होती. 'कष्टाच चीज झाल ग' माझ्या हातात पेढ्याचा बॉक्स देत ती म्हणाली. तनय आता हॉस्टेलमध्ये राहणार होता, तोही खुष दिसत होता. पण आठ दिवस झाले नाहीत तर निशाचा रडवेल्या आवजातील फोन. ' अग तनय मला कॉलेज झेपत नाही परत यायच म्हणतोय.परीक्षेच्यावेळी तू दिलेल्या औषधाचा फायदा झाला होता. आता काही देता येइल का? मला तर काही सुचतच नाही बघ.' मी तिला धीर दिला. तनयला पुष्पौषधी दिली.त्याची समजुत काढली. थोड्या दिवसानी त्याचा फोन आला 'मावशी थँक्स! माझ्या मित्रानाही देशील का औषध?'
आणि म्हणून मी हे टिपण लिहिल. मैत्रीणिच्या हॉस्टेलच्या रेक्टरना दिल. काही मायबोलीकरानी फ्लॉवर रेमेडीविषयी लिहावयास सुचविले होते. तसच आता विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश होत आहेत. बरीच मुल हॉस्टेलमधे जातील. अशावेळी सदर लेखन उपयुक्त होइल असे वाटल्याने येथे देत आहे.
आजच्या गतीमान आणि स्पर्धेच्या युगात विकासाबरोबर मानसिक ताणतणाव वाढले आहेत. यातून नैराश्य, भयगंड, उदासिनता, आत्महत्येची प्रवॄत्ती असे अनेक मानसिक आजार वाढले आहेत. ग्रामीण- शहरी, श्रीमंत-गरीब,स्त्री-पुरुष, वृद्ध-तरुण, नोकरदार-व्यावसायिक-गृहिणी अशा सर्वच पातळीवर मानसिक आणि त्यातुन होणारे मनोकायिक आजार वाढत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक आरोग्यावर ताबा मिळवण्यासाठी पुष्पौषधी मदतीचा हात देउ शकतात.
ब्रिटिश वैद्यक चिकित्सक डॉ. एडवर्ड बाख यांनी १९३८ साली ही उपचार पध्दती जगासमोर आणली. आणि स्वतःच स्वतःला बरे करा हा मंत्र दिला. याद्वारे व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडवणार्‍या नकारात्मक भावनांवर इलाज केला जातो. विविध नकारात्मक भावनांवर इलाज करणारी ३८ औषधे; सहा वर्षांच्या अथक प्रयत्नातुन त्यानी शोधुन काढली. फुलांपासुन तयार केली जाणारी ही औषधे
अत्यंत सुरक्षित आहेत. इतर पॅथीची औषधे चालू असताना ही घेता येतात. वेळोवेळी मी याचा अनुभव घेतला आहे..सदर लेखात हॉस्टेलमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्याना पुष्पौषधी कशा उपयुक्त ठरतील याची माहिती दिलेली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुर्वीच्या काळी गाव सोडून बाहेर जाण्यास लोक फारसे उत्सुक नसत. आज मात्र शिक्षणासाठी नोकरीसाठी गाव सोडून शहराकडे जाणार्‍यांची संख्या वाढत आहे. उच्च शिक्षणासाठी तर मुलांप्रमाणे मुलीही बाहेरगावी जाताना दिसतात. त्यामुळे कॉलेजची, विद्यापीठाची हॉस्टेल्स आहेतच शिवाय खाजगी हॉस्टेल्सची संख्या वाढत आहे.
हॉस्टेलमधे राहणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी पहिली गरज असते ती जमवून घेण्याची. तडजोड करण्याची. धर्म, प्रांत,भाषा,संस्कॄती,आर्थिक परिस्थिती या सर्वच बाबतीत ! हॉस्टेलमधे राहणार्‍यात विविधता असते. रुममेट कोण असेल सांगता येत नाही. घरापासून दूर, दुसर्‍या प्रदेशात राहायचे. तिथली हवा,संस्कृती,खाणेपिणे सर्वच वेगळे असते.शालेय पातळीवरील शैक्षणिक जीवन आणि कॉलेजमधील शैक्षणिक जीवन यात फरक असतो. या सर्वांशी जुळवून घ्यायचे तर, वॉलनट(Walnut) ही पुष्पौषधी अगदी जिवलग मित्र बनून तुमची सतत साथ-सोबत करु शकते.
प्रथम वर्षातील विध्यार्थ्याना जमवून घेण्याबरोबर घरची आठवण येणे स्वाभाविक असते. खाण्याजेवणाची आस्थेने विचारपूस करणारे मागे लागून खायला लावणारे कोणी नसते. अभ्यासाचे टुमणे लावणारे, मायेची पाखर घालणारे कोणी नसते. घर म्हणजे काय याची खरी किंमत समजते. अभ्यास सोडून पैसे खर्च करुन सारखे सारखे घरी जाणे परवडणारे नसते. आठवणींची तीव्रता वाढत जाते. या अवस्थेतुन हनीसकल (Honeysuckle)अलगद बाहेर काढते.
मराठी माध्यमातून शिक्षण झाले असल्यास इंग्रजी माध्यमातून शिकणे अवघड जाते. छोट्या गावात आपण 'वासरात लंगडी गाय शहाणी' असतो. इथे एकापेक्षा एक हुषार विद्यार्थी पाहून आत्मविश्वास गमावल्यासारखे वाटते. ग्रामीण भागातून आल्यास शहरी वातावरण, भाषा यामुळे आपण गबाळे आहोत असे वाटते. आणि न्युनगंड निर्माण होतो.या सर्वातून लार्च (Larch) तुमच्यातील राजहंस जागॄत करत आत्मविश्वास मिळवून देतो. याशिवाय प्रॅक्टिकल, प्रेझेंटेशन, तोंडी परीक्षा यासर्वांसाठीही आत्मविश्वास देण्याचे काम लार्च करते.
याबरोबर मिम्युलस (Mimulus) दिल्यास परीक्षा, प्रॅक्टीकल याबद्दल वाटणारी भीती कमी होते.
विद्यार्थ्यांचे बरेचसे ताणतणाव परीक्षा, अभ्यास यांच्याशी निगडित असतात. परीक्षेची तारीख जवळ आलेली असते. अभ्यास झालेला नसतो. मग झोप उडते. स्मरणशक्ती दगा देईल असे वाटते. अशावेळी व्हाईट चेस्टनट(White Chestnut) हळुवारपणे दिलासा देते. काहीवेळा अभ्यास पूर्ण झालेला असतो. पण पेपर हातात आल्यावर उत्तेजना इतकी वाढते की पेपर सोपा असूनही आणि अभ्यास तयार असूनही अचानक काही आठवेनासे होते. त्यावेळी व्हाईट चेस्ट नट आवर्जून घ्यावे.
कवी, लेखक, संशोधक यांच्या सर्जनशीलतेला खतपाणी घालण्याचे काम व्हाईट चेस्टनट करते. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, संशोधनप्रकल्प यात भाग घेणारे यानी व्हाईट चेस्टनट अवश्य घ्यावे.
सततचा अभ्यास प्रॅक्टिकल, लेक्चर्स, तोचतोच दिनक्रम यामुळे एकसुरीपणा येतो. कंटाळा येतो. बोअर झालो हा शब्द वारंवार यायला लागतो. अभ्यासाचा कंटाळा येतो. एकदा अभ्यासाला बसल्यावर छान अभ्यास होतो पण सुरुवातच होत नाही.अशा धक्का स्टार्ट मंडळींचा कंटाळा घालवण्याचे काम हॉर्नबीम (Hornbeam) करते.
हॉस्टेलमध्ये राहणार्‍या भिडस्त स्वभावाच्या कोणाचेही म्हणणे पटकन पटणार्‍या विद्यार्थ्याना हॉस्टेलमधील जीवन त्रासदायक होते. त्यांच्या घरुन आलेला खाउचा डबा त्यालाही न ठेवता सगळे फस्त करतात. कॉमन संडास-बाथरुम असल्यास हे सतत मागे राहतात. असे भिडस्त, कोणाचेही म्हणणे पटकन ऐकणारे, भिडेखातर किंवा गटात एकटे पडू या भीतीने, मित्रांच्या सांगण्यावरुन व्यसनाच्या आधीन होतात. अशा भिडस्ताना सेंटारी (Century) मदतीचा हात देते.
भिडस्तपणामुळे किंवा वाइट संगतीमुळे व्यसनाधीन झालेल्याना, व्यसन सोडायची इच्छा असते. पण भावनाना आवर घालता येत नाही. अशावेळी अनावर भावनाना आवर घालण्याचे काम चेरी प्लम (Cherry Plum) करते.
विविध कारणांनी विद्यार्थ्यांच्या भावना अनावर होउ शकतात. काहीवेळा रॅगींगला तोंड द्यावे लागते; परीक्षेत अपयश येते; अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड येते; रागाच्या भरात आपल्या हातून विपरित घडेल अशी भिती वाटते; अशावेळी कमकुवत मनाच्या व्यक्तींना नैराश्य, वैफल्य यानी घेरले जाते. आत्महत्या करावीशी वाटते. स्वीट चेस्टनट (Sweet Chestnut) यापासुन परावृत्त करते.
आणि वडिलकीच्या नात्याने कान पिळून मानसिक संतुलन जाग्यावर आणण्याचे काम चेरी प्लम (Cherry Plum) करते.
कॉलेज जीवनात विशेषत: इंजिनिअरींगच्या विद्यांर्थ्यांबाबत विषय राहणे, वर्ष राहणे हे अनेकांच्याबाबत घडत. कधीही नापासाचा शिक्का न बसलेल्या विद्यार्थ्यांना हे इअर डाउन, सब्जेक्ट डाउन प्रकरण मानसिक ताणाचे वाटते. नैराश्य येते. नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. या सेट बॅकला तोंड देउन नव्या जोमाने अभ्यासाला लागण्यास जेंटीयन (Gention) उपयोगी पडते.
डॉ. बाखच्या ३८ औषधांपैकी वरील सर्व औषधे हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण मानसिक समस्या लक्षात घेउन सांगितलेल्या आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने गरजेनुसार ३८ औषधांपैकी वेगवेगळी औषधे घेणे गरजेचे असते.
डॉ. बाखनी पाच औषधे एकत्र करुन तयार केलेले ३९ वे औषध रेस्क्युरेमेडी (Rescue Remedy) . हे औषध मात्र हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांपुरतेच नाही तर; प्रत्येक व्यक्तीने जवळ ठेवावे असे आहे. संकटप्रसंगी, आणीबाणीच्या वेळी हे औषध हमखास उपयोगी पडते. छोटा मोठा अपघात, भाजणे, कापणे यासाठी डॉक्टरांच्यापर्यंत पोहचेपर्यंत प्रथमोपचार
म्हणुन RR या नावाने ओळखले जाणारे हे औषध चोख कामगिरी बजावते. नकारात्मक विचार, मानसिक अस्वस्थता यासाठी हे घ्यावे.
मित्रानो, मी स्ट्राँग आहे मला नाही मानसिक उपचारांची गरजा अशी आत्मप्रौढी न बाळगता पुष्पौषधी 'Friend in need ' आहे हे ओळखून त्यांच्याशी मैत्री करा आणि खुशाल ताणतणावाना भिडा. हॉस्टेल लाइफ निरामय आनंददायी करा.
(टीप : ही औषधे कोणत्याही होमिओपॅथीच्या दुकानात मिळतात.पाचपर्यंत ओषधे एकत्र घेता येतात.दिवसातुन चार मात्रा सर्वसाधारणपणे घ्याव्या.समस्या तिव्र असल्यास तासातासानेहि घेउ शकता यापासुन कोणताहि अपाय नाही.)
डॉ.शोभना तीर्थळी

Monday 1 October 2012

जेष्ठ नागरिकांना आनंदी जीवन जगण्यासाठी पुष्पौषधी

आज जेष्ठ नागरीक दिन ! त्या निमित्ताने जेष्ठांसाठी हा छोटासा लेख.
जेष्ठांच्या बर्‍याच शारीरिक आरोग्याच्या समस्या मानसिक आरोग्याशी निगडित असतात.
मानसिक आरोग्यावर ताबा मिळवण्यासाठी पुष्पौषधी मदतीचा हात देउ शकतात.
ब्रिटिश वैद्यक चिकित्सक डॉ. एडवर्ड बाख यांनी १९३८ साली ही उपचार पध्दती जगासमोर आणली.आणि स्वतःच स्वतःला बरे करा हा मंत्र दिला.याद्वारे व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडवणार्‍या नकारात्मक भावनांवर इलाज केला जातो.विविध नकारात्मक भावनांवर इलाज करणारी ३८ औषधे सहा वर्षांच्या अथक प्रयत्नातुन त्यानी शोधुन काढली. फुलांपासुन तयार केली जाणारी ही औषधे.
इतर पॅथीची औषधे चालु असतानाही ही औषधे घेता येतात. वेळोवेळी मी याचा अनुभव घेतला आहे. इतरांप्रमाणे जेष्ठ नागरीकांनाही मी ती दिली आणि त्यांचे जगणे आनंदी होताना पाहिले.
जेष्ठांच्या विविध समस्यांपैकी जुळवून घेणे ही एक समस्या असते. हे जुळवून घेणे नव्या पिढीशी, निवॄत्तीनंतर बदललेल्या स्थानाशी, हवामानाशी, विविध आजारांमुळे बदललेल्या आहार-विहाराशी, बदललेले घर, गाव असे अनेक प्रकारचे असू शकते. वॉलनट ही पुष्पौषधी हे जुळवून घेण सहजसाध्य करते.
जेष्ठांची आणखी एक समस्या म्हणजे भविष्याची चिंता, मृत्युची, आपण लोळागोळा होऊन तर पडणार नाही ना ही भिती. गॉर्स या समस्येला तोंड देण्याचे बळ देते
अपघात चोरी दरोडा अशा बातम्या कानावर सतत येत असतात. त्या ऐकुन अनामिक भिती निर्माण होते. अ‍ॅस्पेन ही भिति घालवते.
गमावलेला आत्मविश्वास परत देण्याचे काम लार्च करते.
पति-पत्नी यापैकी एका साथीदाराच्या निधनामुळे झालेल्या दु:खावर रेस्क्यु रेमेडी हळुवार फुंकर घालते. ५ औषधांच्या मिश्रणातुन बाखनी बनवलेले हे औषध आपत्कालिन परिस्थितित मनोबल स्थिर ठेवण्यास मदत करते.
उदाहरणादखल वरिल काही औषधे सांगितली.
आपली नेहमीची औषधे घेणे मात्र अजिबात विसरायचे नाही.
योग्य आहार, आवडीचे छंद, पुरेसा व्यायाम, पुरेशी विश्रांती यांच्या जोडीने पुष्पौषधी घेउयात. स्वतः आनंदी राहुन इतरांनाही आनंदी करुयात.
ही औषधे होमिओपॅथीच्या दुकांनांमध्ये उपलब्ध असतात. गरज असेल तेव्हा दिवसातून चार वेळा चार -चार गोळ्या घ्याव्यात.
जेष्ठाना "जेष्ठ नागरिक दिना" निमित्त या, माझ्या त्यांना शुभेच्छा !

Monday 24 September 2012

फ्लॉवर रेमिडीची जन्म कथा

                                                 फ्लॉवर रेमिडीची जन्म कथा
२४ सप्टेंबर हा डॉक्टर एडवर्ड बाख यांचा जन्मदिवस येऊ घातलेला आहे. बाख आणि त्यानी शोधुन काढलेली फ्लॉवर रेमेडी ही उपचार पद्धती याचा माझ्यावर खुप प्रभाव पडला. त्याच्या वापराने मी स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवनात थोडाफार आनंद निर्माण करु शकले. बाखचे विचार पोचवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच.
फ्लॉवर रेमेडीची जन्मकथा सुरु होते बर्मिंगहॅम जवळच्या मोस्ले नावाच्या निसर्गरम्य खेड्यात. इथच फ्लॉवर रेमेडिचे जनक एडवर्ड बाख यांचा जन्म २४ सप्टेंबर १८८६ला झाला. लहानपणापासुनच निसर्गाच वेड होत.शाळेला सुटी पडली कि ते डोंगर दर्‍यातुन हिंडत. प्राणी,पक्षी, वृक्षवल्लरींचे तासनतास निरीक्षण करत.त्याना आपण बरे करत आहोत अशा स्वप्नरंजनात रमत. जिज्ञासु वृत्ती, विलक्षण एकाग्रतेने निरीक्षण करुन विषय समजुन घेणे, त्या विषयाच्या मुळाशी जाउन त्यावर विचार करणे हे पहिल्यापासुन त्यांचे स्वभाव विशेष होते.
डॉक्टर होण्याच्या इच्छेला मुरड घालुन त्याना वडिलांच्या ब्रास फाउंड्रीत काम करावे लागले. निसर्गा प्रमाणे माणसांवरही प्रेम करणारे बाख कामगारांच्या समस्या पाहुन व्यथित होत. मानसिक समस्यानी ग्रासलेल्या कामगारांवर उपचार केले जातात ते त्यांच्या शरीरावर,म्हणजे परीणामावर. आजाराचे मुळ कारण तसेच राहते. त्यामुळे आजार औषधोपचारानंतरहि पुन्हा पुन्हा उदभवतात. यावरुन प्रचलित उपचार पद्धतित त्रुटी आहेत असे त्याना वाटु लागले. त्यापद्धतीच्या मूळाशी जाउन अभ्यास केल्यासच त्रुटी लक्षात येतील असे त्यांच्या मनाने घेतले. वैद्यकीय शिक्षणासाठी ते लंडनमध्ये आले.
लंडनला आल्यावर निसर्गापासून दूर आलेल्या बाखना एकीकडे शहरातील गजबज,वाहनांची वर्दळ हे तापदायक वाटे तर दुसरीकडे विविध रोग्यांशी गप्पातुन मेंदुला भरपुर खुराकही मिळत असे. त्यामुळे प्रचलित उपचार पद्धतिच्या मर्यादाविषयिच्या त्यांच्या अनुमानाला दुजोराच मिळत गेला. जेवणाचे पैसे वाचवून ते भरपुर पुस्तके घेत व अभ्यासत. यातुन आधुनिक वैद्यक,व्याधीवर उपचार करते व्यक्तीवर नाही. हे त्यांचे गृहितक अधिकाधिक पक्के होत गेले. अल्पावधितच ते एम.बी.बी. एस. झाले.डी.पी एच.(Diploma in Public Health)ही पदवीही घेतली.
इतर विद्यार्थांपेक्षा ते वेगळे होते. रुग्णांना फक्त औषधे न देता त्यांच्याशी ते गप्पा मारत. त्यांच्या दु:खावर फुंकर घालत. रुग्णही त्यांच्यापाशी आपल्या व्यथावेदना मोकळ्या करत.
एकदा एक तीव्र दमा असलेली बाई उपचारासाठी आली. अतिशय घाबरलेली.तिच्या मुलाने नॉर्थै इंग्लंडमध्ये तीन महिन्यापुर्वी नोकरी धरली होती. गेल्यापासुन त्याची काहीच खबरबात नव्हती. तो आजारी तर नसेल ना? त्याला अ‍ॅक्सिडेंट तर झाला नसेल ना? त्याचे निधन झाले असेल का? अशा नाना शंकानी तिला घेरले होते. काही दिवसानी तिने मुलगा परत आल्याची आणि जवळच नोकरी धरल्याची बातमी दिली. मुलाची काळजी संपली आणि तिचा दमाही गायब झाला.
दुसरा एक रुग्ण पोटाच्या त्रासानी ग्रासला होता. अल्सरची शक्यता वाटत होती. त्याची नोकरी गेली होती. दोन लहान मुले,पत्नी नोकरी करु शकत नव्हती. त्याला पोखरणार्‍या काळजीनी अल्सरच दुखण बहाल केल होत. त्याला नोकरी लागली आणि त्याचा आल्सरही कमी झाला. आज आधुनिक वैद्यकानेही काळजीने आल्सर होउ शकतो हे मान्य केल आहे. पण त्याकाळी अस मानल जात नव्हत.
अशा विविध रुग्णाना हाताळताना त्याच्या पुर्वीच्या गृहितकावर शिक्कामोर्तबच झाल. काही निरिक्षणही त्यानी नोंदवली.
दु:ख हलक करण्यासाठी मानसिक अवस्था बदलण्यासाठी त्यावर फक्त फुंकर घालणे पुरेसे नाही. विशिष्ट रोगावरील विशिष्ट औषध सर्वानाच लागु पडत नाही. ज्या रुग्णांचा स्वभाव सारखा असतो त्याना ते लागु पडते,तिच तक्रार असणार्‍या पण वेगळ्या स्वभावाच्या लोकाना लागु पडत नाही.
या निरीक्षणाबरोबरच आजार बरा होण्यासाठी इंजक्शनद्वारे वेदना देणेही त्याना पसंत नव्हते. सोपी, वेदनारहित,व्याधीबरोबर व्यक्तिलाहि बरी करणारी उपचार पद्धती त्याना हवी होती.
पॅथॉलॉजिस्ट व जीवजंतु शास्त्रज्ञ म्हणुन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधे त्यांची नोकरी चालुच होती. शिवाय स्वतःच्या लॅबोरेटरीत ते प्रयोग करत. जीवजंतुशास्त्रज्ञ म्हणुन ते नावारुपाला आले.१९१३ मध्ये नोकरी सोडुन त्यानी स्वतःचा दवाखाना सुरु केला. त्यांच्या नावलौकिकामुळे रुग्णांची गर्दी वाढत होती. प्रयोग शाळेतील काम दवाखाना आणि नविन उपचार पद्धतीचा सततचा ध्यास या सर्वाच्या अतिताणामुळे ते एकदा बेशुद्ध पडले. त्यांच्या मेंदुवर शस्त्रक्रिया करावी लागली. दुखणे जीवावरचे होते डॉक्टरनी २/३ महिने जगु शकाल अशी स्पष्ट कल्पना दिली होती. यामुळे न खचता ते इच्छित संशोधनासाठी कमी वेळ आहे म्हणुन झपाट्याने कामाला लागले. मृत्यू मात्र त्यांच्यापासुन दूर पळत होता. त्या नंतर ते १८ वर्षे जगले.
१९२८ मध्ये होमिओपाथीचे जनक हनिमान यांचे ऑरगॅन हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. बाखच्या विचाराशी त्यातील विचार जुळणारे होते. व्यक्तिच्या शरीराबरोबर मनाचाही त्यात विचार केला होता. हनिमनच्या विचारात अधिक संशोधनाने भर घालावी असे त्यानी ठरवले. त्यानुसार विविध रिसर्च जर्नलमधुन शोधनिबंध लिहिले. रॉयल लंडन होमिओपाथिक हॉस्पिटलच्या प्रयोग शाळेत काही दिवस कामहि केले. प्रती हनिमन म्हणुन ते ओळखले जाऊ लागले.
इतके करुन बाखची तगमग मात्र कमी होत नव्हती. होमिओपाथीतील हजारो औषधे,त्यांच्या क्षमता हे त्याना सर्व सामान्यांच्या दृष्टीने किचकट वाटु लागले. यापेक्षाही सोपी सर्वसामान्याना स्वतःच स्वतःला बरे करता येइल अशी सोपी उपचार पद्धती त्याना हवी होती. निसर्गातील चैतन्य शक्तीतून ती मिळतील असे त्याना वाटु लागले. निसर्ग त्याना खुणाऊ लागला. शेवटी हार्वे स्ट्रीटवरील खोर्‍यानी पैसे देणारा चालता दवाखाना सहकार्‍याला देउन वेल्सच्या जंगलात प्रयाण केले. बरोबर होती सहकरी नोरा विक्स(Nora Weeks).
दूर जंगलात कोणत्याही शहरी सुविधा नसताना राहणे शारीरिक मानसिक दृष्ट्या क्लेशकारक होते, नोराला माहित होते. नोरा व्यवसायाने रेडिओग्राफर होती. लंडन हॉस्पिटलमध्ये बाखच्या हाताखाली काम करत होती. बाखचा दृष्टिकोन, सत्यशोधनाचा ध्यास,त्यासाठी लागणारी असामान्य बुद्धीमत्ता,त्याला रुग्णाबद्दल वाटणारी आत्मियता,संवेदनशिलता, इप्सित साध्याकडे पोचण्यासाठी झोकुन देऊन काम करण्याची वृत्ती आणि आपले विचार प्रत्यक्षात आणण्याची कृतिशिलता या सर्वामुळे प्रभावित झालेली होती. त्यामुळे वेल्सच्या जंगलात संशोधनासाठी जाण्यास बाखनी निमंत्रित केल तेंव्हा ती लगेच सहकार्या साठी तयार झाली. बाखच्या सर्व संशोधनात ती त्याचा उजवा हात होती,सर्व संशोधन प्रक्रियेची साक्षीदार होती. देहभान ,भुक तहान विसरुन संशोधनात गुंतलेल्या डॉक्टरांची देखभाल तिने मनापासुन केली. बाखच्या कार्यात नोराच्या निष्ठेचा,आणि निरपेक्षपणे घेतलेल्या काळजीचा खुप मोठा वाटा आहे.
वेल्सच्या जंगलातील निसर्गाच्या सहवासात बाख यांच्या प्रतिभेला बहर आला. लहानपणापासुन निसर्गाच्या सहवासात राहिल्याने विविध वनस्पतींची त्याना ओळख होती. वनस्पतीची बीजे फुलात असतात त्यामुळे वनस्पतीचे सर्व गुण फुलात असले पाहिजेत अशी अटकळ बाखनी बांधली. त्यानुसार संशोधन सुरु केले. पहिले फुल सापडले इंपेशन्स,नंतर मिम्युलस्,त्यानंतर क्लेमॅटीस....
या फुलापासुन तयार केलेल्या औषधाचा त्यांच्या दवाखान्यातील रुग्णावर वापर सुरु केला. परिणाम आश्चर्यजनक होता. बाखचा हुरुप वाढला.आपल्याला हवी तशी औषधोपचाराची नविन सोपी पद्धत आपण शोधली आहे असे त्याच्या लक्षात आले. वेळ काळ ,तहान भूक कशाचीच तमा न बाळगता ते कामाला लागले. निसर्गाशी तदात्म्य पावले. त्यांची ज्ञानेंद्रिये अतीसंवेदनशिल बनली. इतकी की इतराना न दिसणार्‍या गोष्टी त्याना दिसु लागल्या. स्पर्श ज्ञान सुक्ष्म झाले. झाडांची स्पंदने त्याना जाणवू लागली. एखादे फुल तळहातावर,जिभेवर ठेवले तरी त्या फुलांचे गुणधर्म जाणवू लागले. शेवटी शेवटी आपल्या स्वतःच्या मनाची नकारात्मक संवेदना जागवून विविध फुले त्या अवस्थेत हाताळुन त्यानी स्वतःवर प्रयोग केले. औषधातील सुप्त गुणांचा शोध लावला. मनाच्या भीती, साशंकता, अनिश्चितता, एकटेपणा, उदासिनता, नैराश्य, अतिसंवेदनशिलता, इतरांची अवास्तव काळजी अशा सात नकारात्मक अवस्थांची ३८ औषधे शोधली. आणि त्याद्वारे उपचाराची सोपी पद्धतहि. शुद्ध पाणी,ऊन, फुललेली फुले आणि स्वच्छ् काचेचे भांडे एवड्याच साहित्याच्या आधारे हि तयार करता येणार होती. शेवटचे अडतिसावे औषध शोधल्यावर त्यानी जाहिर केले. सर्व नकारात्मक भावनावर औषधे शोधली आहेत. या औषधाच्या आधारे त्यानी हजारो व्यक्तींवर यशस्वी उपचार केले. पुस्तके लेख याद्वारे हि ज्ञान गंगा लोकांपर्यन्त पोचवली.
लंडनमधील मेडिकल असोशिएशनने हे सर्व गैर असल्याची अनेकवेळा ताकिद दिली. पण बाखने त्याकडे लक्ष दिले नाही. जंगलात राहुन त्यानी जे कष्ट घेतले त्याचा शरीरावर व्हायचा तोच परीणाम झाला. २७नोव्हेंबर १९३६ ला शांत झोपेत त्यांचे निधन झाले.
'Heal Thyself 'म्हणजे स्वतःच स्वतःला बरे करा या पुस्तकातुन त्यानी आपले फ्लॉवर रेमेडी विषयीचे विचार मांडले.त्यानुसार आजाराचे स्वरुप समजण्यासाठी काहि मुलभूत तत्वे पुढीलप्रमाणे :
१) व्यक्तीचा स्व म्हणजे फक्त बाह्य शरीर नाही तर आत्मा ही आहे. आणि हा स्व परमेश्वराचा एक अंश आहे. तो अमर आहे. शरीर हे फक्त साधन आहे. प्रवासात घोडा वापरतात.प्रवास संपला की त्याच काम संपत. तस शरीराच आहे.
२) निसर्ग पूर्णत्वाकडे जाणारा. आत्मा हा त्याचाच एक अंश आहे.
३) आत्म्याच निसर्गाशी संतुलन होत तेंव्हा आनंद मिळतो. चांगले आरोग्य मिळते. तुम्ही राजा असा रंक असा,गरीब असा वा श्रिमंत. जोपर्यंत तुम्ही आत्म्याच्या इशार्‍यानुसार चालता तोपर्यंत सर्व चांगले असते. तुमचा योग्य विकास होतो.
४) सर्व चराचर विश्वात एकत्व असते. वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या वाटल्या तरी त्या पुर्णाचा एक भाग असतात त्यामुळे स्वतःविषयी क्रिया किंवा दुसर्‍याविरुद्धच्या क्रियेचा परिणाम पुर्णाबाबत होतो त्यामुळे स्वत्;शी परात्मता निर्माण होणे आणि दुसर्‍याशी निर्दयपणे वागणे, यातुन संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्ष आजार निर्माण करतो. हि चूक सुधारली तर शांतता आणि आरोग्य लाभत.
५) आजाराच्या स्वरुपावरुन तो एकतेच्या विरोधात कोणत्या क्रियेने गेला हे समजु शकत. उदा.भीतीने आल्सर्, द्वेषाने थायमस ग्लँडवर परिणाम होतो; थायमस ग्लेंड नीट काम करत नसेल तर प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. अभिमान,उद्धटपणा,मनाचा ताठरपणा यांचा परीणाम शरीरात ताठरपणा र्निर्माण करणारे आजार होण्यात होतो.
६) आजार एका परीने फायद्याचा. कारण तो स्वकडे जाण्याचा मार्ग असतो.आपली चूक समजली तर आपण आजाराचा प्रतिकार करु शकतो. आजार टाळु शकतो.
७) चूक सुधारण्यासाठी त्या चूकीच्या विरुद्धचा गुण आत्मसात करावा. उदा.स्वप्रेम हे अनेक आजारांचे मुळ आहे. सर्वांवर प्रेम करणे हा त्याविरुद्धचा गुण आत्मसात करुन ती चूक सुधारावी. स्वतःच्या हिताबरोबर मानवतेच्या हितात ती चूक परिवर्तीत होऊन दु:खे कमी होतील.
आपले विचार लिखित स्वरुपात लोकांसमोर मांडुन झाल्यावर त्यांनी आपली सहकारी नोरावर सर्व जबाबदारी सोपवली. आणि या उपचार पद्धतीत अपेक्षित साधेपणाला - सोपेपणाला धक्का लागु देउ नये असे सांगितले. नोरानेही सहकारी व्हिक्टर बुलेन(Victor Bullen) यांच्या सहाय्याने वेळोवेळी येणार्‍या अमिषाला बळी न पडता बाखची अपेक्षा पूर्ण केली.
बा़खच हे काम दैवी वाटाव; संतत्व बहाल कराव अस होत. पण बाखला स्वतःलाच अशी व्यक्तिपुजा मान्य नव्हती.तो स्वतःला निसर्गाचा एक अंशच मानत होता. निसर्गाकडुन म्हणजे त्याच्या देवाकडुन त्याचा साधन म्हणुन वापर केला गेला अशीच त्याची भूमिका होती. आपल्यानंतर आपले स्तोम माजवू नये असे त्यानी निक्षून सांगितले. या त्याच्या अपेक्षेचा मान सहकार्‍यानीही राखला. आजही बाख सेंटर त्यानी घालुन दिलेल्या मार्गावर चालू आहे.
बाखचे विचार आणि त्यानी शोधलेली नविन उपचार पद्धती आज जगभर प्रचलित आहे. 'Medicine of the future' ही त्याची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे.
संदर्भः
१)Heal Thyself- Edward Bach
2)The Bach Flower Remedies Step by Step - Judy Ramsell Howard
3)Question & Answer - John Ramsell
४)पुष्पज औषधी - आसावरी केळकर, डॉ.सचिन देशमुख